बिग ब्रेकिंग ! चिमणी पाडकामाबाबत पोलीस आयुक्तांनी काढला 'हा' आदेश

'या' परिसरात जाण्यास राहणार संचारबंदी ! वाचा !

बिग ब्रेकिंग ! चिमणी पाडकामाबाबत पोलीस आयुक्तांनी काढला 'हा' आदेश

सोलापूर : प्रतिनिधी

श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाची प्रक्रिया पूर्ण करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी मंगळवारी मनाई आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एक किलोमीटर परीघात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करून पर्यायी रस्ते देण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार कोणतेही अत्यावश्यक कारण, सेवा वगळता येथे कोणालाही संचार करता येणार नाही. श्री सिद्धेश्वर साखर कारखाना परिसराच्या एक किलोमीटर परिघातील सर्व सभागृह, मंगल कार्यालय, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स, धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे बंद राहणार आहेत. या आदेशाचा भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. अशा व्यक्तीविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी दिले आहेत.

याशिवाय मंगळवार १३ जूनच्या रात्री १२ वाजल्यापासून रविवार, १८ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत खालील मार्गावरून श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे येण्यास व जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास बंदी घालण्यात आली आहे.

वाहनांसाठी बंद करण्यात आलेले मार्ग :-

१) सोलापूर ते होटगी रस्त्यावरील विमानतळ प्रवेशद्वाराजवळील कुमठे गावाकडे जाणाऱ्या जोड रस्त्यापासून ते श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ते होटगी गाव जाण्यासाठी व येण्यासाठी.

२) श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ते कुंभारी जाण्यासाठी व येण्यासाठी.
----------
वाहनांसाठी देण्यात आलेले पर्यायी मार्ग :-

१) सोलापूर ते होटगी रस्त्यावरील विमानतळ प्रवेशद्वाराजवळील कुमठे गावाकडे जाणाऱ्या जोड रस्त्यापासून रेल्वे पूलाखालून कुमठे गाव- मद्रे गाव - आहेरवाडी - फताटेवाडी ते होटगी गाव जाण्यासाठी व येण्यासाठी.

२) कुंभारी गाव - मौलाना आझाद पॉलिटेक्निक कॉलेज - यत्नाळ रस्ता ते होटगी जाण्यासाठी व येण्यासाठी.

या आदेशाचा भंग करणारे शिक्षेस पात्र राहतील असेही पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी आदेशात म्हटले आहे.

पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी काढलेल्या या आदेशानंतर सोलापूर महानगरपालिकेकडून चिमणी पाडकामाची कारवाई मंगळवारी मध्यरात्रीनंतर कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते, असा कयास बांधला जात आहे. त्यामुळे सोलापूरकरांचे लक्ष आता या कारवाईकडे लागून राहिले आहे.