विजयपूर रस्त्यावरील ड्रेनेजच्या कामाला होणार उशीर ?
कठीण खडक असल्याने विलंबाची शक्यता
सोलापूर : प्रतिनिधी
विजयपूर रस्त्यावरील रेल्वे पूलाच्या खालून टाकण्यात येणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या कामाला उशीर लागण्याची शक्यता आहे. खोदाईच्या कामावेळी कठीण खडक लागल्याने हा विलंब लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोलापूर महानगरपालिकेकडून विजयपूर रस्त्यावर ड्रेनेज लाईनचे काम करण्यात येत आहे. रेल्वे पूलाच्या एकबाजूकडून दुसऱ्या बाजूकडे ५० मीटरचा पाईप टाकण्यात येत आहे. हे काम करताना पूल ढासळण्याची शक्यता असल्याने या पूलावरून होणारी वाहतूक ६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर पर्यंत थांबविण्यात आली आहे.
ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सोलापूर महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी सांगितले होते. मात्र या कामात तांत्रिक अडचणी आल्याने हे काम आणखी काही दिवस पुढे चालणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पाईप जोडणीचे काम सुरू असून दुसऱ्या बाजूला खोदाईचेही काम करण्यात येत आहे. मात्र तांत्रिक कारणांमुळे या कामाला उशीर होत असल्याचे सांगण्यात आले.
कामाला विलंब लागत असल्यामुळे सध्या होटगी रस्ता आणि श्री रेवणसिद्धेश्वर मंदिराकडून होणारी वाहतूक आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे होटगी रस्त्यावरील वाहतुकीवर प्रचंड ताण पडत आहे. दरम्यान, याबाबत महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.