आयुक्त म्हणाले, अजून १० दिवस जड वाहतूक आसरा रेल्वे पूलावरूनच
जड वाहतुकीची वेळ बदलण्याची गरज
सोलापूर : प्रतिनिधी
होटगी रस्ता, जुळे सोलापूर अन मजरेवाडी भागातील नागरिकांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. कारण, आसरा रेल्वे पूलावरून सध्या सुरू असलेली जड वाहतूक अजून १० दिवस येथूनच कायम राहणार असल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी 'महाबातमी' ला दिली.
विजयपूर रस्त्यावरील रेल्वे पूलाच्या खालून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. कामादरम्यान पूल ढासळण्याची शक्यता असल्याने ६ ते २० ऑक्टोबरपर्यंत येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. यानंतर १९ ऑक्टोबर रोजी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) रुपाली दरेकर, महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी एकत्रितपणे विजयपूर रस्त्यावरील रेल्वे पुलाची पाहणी केली होती.
यावेळी हलकी वाहने २० ऑक्टोबरपासून येथून सोडावीत आणि ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर जड वाहने ३० ऑक्टोबरपासून सोडावीत, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत येथील काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, हे काम पूर्ण झाले नाही. यानंतर 'महाबातमी' ने आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी काम अद्याप अपूर्ण असल्याने जड वाहतूक अजून १० दिवस आसरा रेल्वे पूलावरूनच होणार असल्याचे स्पष्ट केले.
आसरा रेल्वे पूलावरील रस्ता अत्यंत अरुंद आहे. याच रस्त्यावरून नागरिक आणि मालवाहतूकीचे ट्रक जात असल्यामुळे वाहतुकीवर प्रचंड ताण पडत आहे. हे कमी म्हणून की काय या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अरुंद रस्ता आणि प्रचंड वाहन संख्येमुळे येथे अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येथून होणारी वाहतूक लवकरात लवकर बंद करावी आणि पूर्वीप्रमाणेच विजयपूर रस्त्यावरून सुरू ठेवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
'महाबातमी' ची भूमिका
या समस्येबाबत महाबातमी ची भूमिका अशी, वाहतूक आसरा रेल्वे पूलावरूनच करण्यास दुसरा पर्याय नाही हे काही खरे आहे. मात्र हे काम होईपर्यंत शहरातून सुरू होणारी जड वाहतूक रात्री ९ ते सकाळी ७ ऐवजी रात्री ११ ते सकाळी ६ अशी ठेवली तर नागरिकांना सणासुदीच्या दिवसांत होणारा त्रास वाचणार आहे.
----------
नियमित वाचा 'महाबातमी'
संपर्क :- पुरुषोत्तम कारकल
९८६०८२२२८३