वेलनेस रन मॅरेथॉनमध्ये ३२५ जणांचा सहभाग
आयएमए, निमा, आयडीए आणि फिजिओथेरपिस्ट असोसिएशनकडून आयोजन
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर रनर्स असोसिएशनच्या सौजन्याने आयएमए, निमा, आयडीए आणि फिजिओथेरपिस्ट असोसिएशन या डॉक्टरांच्या चार संघटनांकडून आयोजित करण्यात आलेल्या वेलनेस रन मॅरेथॉनमध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील ३२५ धावपटूंनी सहभाग घेतला. या मॅरेथॉन स्पर्धेला पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला.
८ जानेवारी रोजी होणाऱ्या सोलापूर मॅरेथॉनच्या पूर्व तयारीसाठी आणि सोलापूरकरांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी विविध डॉक्टरांच्या संघटनेकडून वेलनेस रनचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी नूमवि शाळेच्या आवारात सकाळी ६ वाजता झुंबा डान्स घेण्यात आला. त्यानंतर प्राथमिक व्यायाम घेवून प्रत्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी ७ वाजता ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या समोर सुरूवात झाली. पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून ही स्पर्धा सुरू झाली. डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता, विजापूर नाका, पत्रकार भवन ते पुन्हा त्याच मार्गाने नूमवि शाळेत या स्पर्धेचा समारोप झाला. या वेलनेस रनसाठी ३२५ जणांनी नोंदणी केली होती त्यापेक्षा अधिक जणांनी यामध्ये सहभाग घेतला.
लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरीकांचाही यामध्ये सहभाग होता. सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला टी शर्ट आणि किट देण्यात आले. स्पर्धेच्या प्रारंभी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता क्षिरसागर, नूमविच्या अर्चना कुलकर्णी, आपटे मिल्कचे अभिषेक आपटे, डॉ. चिलजवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सोलापूर रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. स्वप्निल कोठाडीया, कार्याध्यक्ष डॉ. विश्वास बिराजदार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या वेलनेस रनसाठी विशेष सहकार्य करून ही मॅरेथॉन यशस्वीपणे पार पाडली. यावेळी आयएमए, निमा, आयडीए आणि फिजिओथेरपिस्ट या डॉक्टरांच्या संघटनांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.