दिलासादायक ! १०० ऑक्सिजन बेड वाढणार, तयारी अंतिम टप्प्यात
काडादी मंगल कार्यालयात नियोजन, महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी
सोलापूर : प्रतिनिधी
ऑक्सिजन बेड नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ आणि त्रास आता काही अंशी कमी होणार आहे. सोलापूर महानगरपालिकेतर्फे सिद्धेश्वर साखर कारखान्याजवळील कडादी मंगल कार्यालयात सुरू होणाऱ्या १०० ऑक्सिजन बेडच्या हॉस्पिटलच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
शुक्रवारी दुपारी महापौर श्रीकांचना यन्नम, सोलापूर महानगरपालिचे आयुक्त पि. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक नागेश भोगडे, श्रीनिवास पुरुड यांनी या हॉस्पिटलची पाहणी केली.
याठिकाणी शुक्रवारी ऑक्सिजन बेडसाठीची वैद्यकीय तांत्रिक तयारी, खाटा लावणे, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करणे, शौचालय उभारणी, स्वच्छता आदी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
सध्या सोलापूरात ऑक्सिजनचा पुरवठा अद्याप सुरळीत नाही. त्यामुळे या सेंटरवर ऑक्सिजनची गरज नसणारे रुग्ण ठेवण्यात येणार आहेत. आगामी ८ ते १० दिवसांत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर येथे ऑक्सिजनची गरज असणारे रुग्ण ठेवण्यात येणार आहेत. ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. ऑक्सिजन पुरवठा योग्य प्रमाणात होताच या हॉस्पिटलच्या माध्यमातून कोविड रुग्णांची मोठी सोय होणार आहे.
----------------------------------
२०० बेडची तयारी
पहिल्या टप्प्यात येथे १०० ऑक्सिजन बेड तयार उपलब्ध करून देण्यात येणार असून हे पूर्ण झाले की दुसऱ्या टप्प्यात आणखी १०० बेड असे एकूण ऑक्सिजनचे २०० बेड सोलापूर महानगरपालिकेकडून कोविड रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' ला सांगितले.