देवाक काळजी रे....!
घाबरू नका, हे ही दिवस जातील !!
देवाक काळजी रे !
होय, २०१७ साली प्रदर्शित झालेल्या रेडू या मराठी चित्रपटाततील गुरू ठाकूर यांनी लिहलेले हे गीत जणू आजच्या कोरोनाच्या परिस्थितीसाठीच लिहिले आहे असा आजचा काळ आहे.
सगळीकडे कोरोनामुळे नकारात्मकता पसरली आहे. गेल्या वर्षभराहून अधिककाळ आपण सगळे या महामारीचा सामना करीत आहोत. मात्र कोरोना आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी हीच परिस्थिती कायम राहील असेही नाही. लवकरच हा अंधःकार दूर होऊन प्रकाशाचा किरण आसमंत उजळणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यकता आहे ती आपल्या मनातील निराशेचे मळभ दूर करण्याची.
आजूबाजूला घडणाऱ्या घटना, कानावर येणाऱ्या वेदनादायक मृत्यूच्या वार्ता, आपल्यासोबत रोज बोलणारे - भेटणारे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट अचानक काही दिवसांच्या आत आपल्याला सोडून निघून जातात ही गोष्ट जरी अत्यंत वेदनादायक असली तरी या सगळ्याला नाईलाजाने मागे सोडून पुढची वाटचाल करणे आपल्याला आवश्यक आणि क्रमप्राप्तही आहे.
या सर्व संकटांच्या काळात आपण मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या स्थिर, सकारात्मक राहणे अत्यंत गरजेचे आहे. काही अभ्यासकांच्या मते सध्याच्या काळात अनेक रुग्णांची स्थिती वाईट होण्याचे कारण केवळ घाबरणे आहे. कोरोनावर मात करून लाखो लोक सुखरूप घरी आले आहेत. त्यामुळे काळजी जरूर घ्यावी पण या रोगाला घाबरून जाऊन रुग्णाने किंवा नातेवाईकांनी निराशेच्या खोल गर्तेत हरवणे समाज स्वास्थ्यासाठी निश्चितच हानिकारक आहे.
चहू बाजूनी वादळे घेरतील l
कुणीही सवे सोबतीला नसेल ll
दिशा वाट सर्वस्वही हारविता l
शिवाजी असे मंत्र हा शक्तीदाता ll
या उक्तीप्रमाणे आपण सगळ्या समाजाने कितीही संकटे आली तरी न डगमगता पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांप्रमाणे संकटावर मात करण्याची मनीषा बाळगली पाहिजे.
याचसाठी 'महाबातमी न्यूज पोर्टल' आजपासून वाचकांसाठी काही खास मजकूर घेऊन येत आहे. या संवाद मालिकेत समाजातील मान्यवर आपल्याला सकारात्मक संदेश देणार आहेत. चला तर मग, बदल घडवूया !, सकारात्मक होऊया !
--- पुरुषोत्तम कारकल
-----------------------
होणार होतला जाणार जातला
मागे तू फिरू नको
उगाच सांडून खऱ्याची संगत
खोट्याची धरू नको
येईल दिवस तुझा हि माणसा
जिगर सोडू नको
तुझ्या हाती आहे डाव सारा
इसर गजाल कालची रे
देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे
-- गुरू ठाकूर