ऐकू कमी येतंय ? ही समस्या घ्या गंभीरपणे ! अन्यथा...
ऑडिओलॉजिस्ट विशाल हिरेमठ यांचा सल्ला
सोलापूर : प्रतिनिधी
तुम्हाला स्पष्ट ऐकू येत नाहीये ?, लक्ष देऊन ऐकावे लागते ?, ऐकू येऊन सुद्धा लक्षात येत नाहीये ? तर मग तुम्हाला श्रवणऱ्हासाची समस्या आहे. याकडे गांभीर्याने पहा अन्यथा भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असा सल्ला हिरेमठ हिअरिंग क्लिनिकचे ऑडिओलॉजिस्ट विशाल हिरेमठ यांनी दिला.
ज्याप्रमाणे सायकल असो कि, दुचाकी, चारचाकी गाडी असो गाडीची सर्व्हिसिंग करणे हे अत्यावश्यकच आहे. त्याप्रमाणे शरीरातील कान, नाक, डोळे अशा संवेदनशील आणि महत्वाच्या अवयवांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
कोणत्याही कारणामुळे कमी ऐकू येत असेल तर तज्ज्ञांकडून वेळेत श्रवण क्षमता चाचणी करून घेतली पाहिजे. ज्यांना कमी ऐकू येते त्यांनी आवश्यकतेनुसार श्रवणयंत्र बसवून घेतले तर त्यांचे पुढील आयुष्य नक्की सुखकर होऊ शकते. अनेकदा महाग म्हणजे वाईट असा समज असतो. हा समज दूर सारून काहीशी जास्त रक्कम द्यावी लागली तरी ती देऊन चांगल्या दर्जाचे श्रवण यंत्र बसवून घेणे अपरिहार्य ठरते, असे ऑडिओलॉजिस्ट हिरेमठ म्हणाले.
चांगल्या श्रवणावर मनुष्याच्या मेंदूचा विकास ठरत असतो. लहान मुले जितके चांगले ऐकू शकतात, तितका त्यांचा विकास वाढीव चांगला होतो. एका सर्व्हेक्षणानुसार चांगले श्रवण करणारे बाळ एका वर्षात सुमारे ६० लाख शब्द ऐकू शकते. एका दिवसात १६ हजार ४३८ तर एका तासात एक हजार ३७० शब्द ऐकू शकते. त्याच्या श्रवण क्षमतेनुसार वाचा व भाषेचा विकासाच्या प्रवासाची गती निश्चित होते. मेंदूचा विकासच श्रवण क्षमतेवर अवलंबून असल्याने मनुष्याच्या शैक्षणिक, सामाजिक, बौद्धिक आणि शारीरिक विकासाच्या प्रक्रियेत ऐकू येण्याची क्षमता मैलाचा दगड ठरते, असे ऑडिओलॉजिस्ट हिरेमठ यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षात अत्यंत वेगाने वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात समाज कळत न कळतपणे सापडत चालला आहे. याचा थेट परिणाम जन्माला येणाऱ्या बाळाच्या श्रवण क्षमतेवर होताना दिसून येत आहे. जन्मतः च कमी ऐकू येण्याची क्षमता असणाऱ्या बालकांचे प्रमाण वाढत आहे. मात्र यातील काही समस्यांवर उपाय निश्चितच आहेत. जन्मानंतरच्या पहिल्या महिन्यातच बाळाची ऐकण्याची तपासणी आणि तिसऱ्या महिन्याच्या आत श्रवण क्षमता चाचणी करणे गरजेचे आहे. यावेळी दुर्दैवाने दोष आढळल्यास सहा महिन्यांच्या आत उपचार सुरू करणे क्रमप्राप्त ठरते. वेळेत तपासणी आणि उपचार केले तर बाळाच्या भविष्यात वाचा आणि भाषा विकासातील दरी पडणार नाही.
मनुष्याचे व्यक्तिमत्व चांगले घडायचे असेल तर चांगले ऐकता आले पाहिजे. त्यासाठी लहान बाळांपासून वयोवृद्ध असणाऱ्या सर्व वयोगटांतील व्यक्तींची श्रवण क्षमता किमान त्यांच्या वयोगटाला आवश्यक इतकी असलीच पाहिजे. नैतिक मूल्यांची जडणघडण आणि बीजारोपण चांगल्या श्रवणातूनच होते हि बाब प्रत्येकानेच लक्षात घ्यायला हवी. त्यासाठी ऐकू कमी येण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्याकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता असल्याचेही ऑडिओलॉजिस्ट विशाल हिरेमठ यांनी सांगितले.
(वाणिज्य वार्ता)
-------------------