आज यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान
सोलापूरात थंडीने हुडहुडी
सोलापूर : प्रतिनिधी
यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद आज बुधवारी झाली. बुधवारी शहरात ११.६ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.
गेल्या तीन आठवड्यांपासून सोलापूरच्या तापमानात चढ- उतार होत आहे. शहरातील तापमान १३ ते २० अंशांच्या दरम्यान नोंदवले जात आहे. वातावरणात सतत बदल होत असल्याने नागरिकांना खोकला, सर्दी अशा समस्यांना सामोरे जावे लागत होते.
गेल्या दोन -तीन दिवसांत मात्र सोलापूरकर गारठून जात आहेत. संध्याकाळी ७-८ नंतर शहरात थंडीची जणू लाट आल्याचा अनुभव येत आहे. मंगळवारी सोलापूरात १२.१ इतक्या किमान तापमानाची नोंद झाली होती. यात बुधवारी आणखी घट झाली.
थंडी वाढल्याने सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांची पावले आपोआपच चहाच्या कॅन्टीनकडे वळत आहेत. अनेकांनी कपाटात ठेवलेले स्वेटर, मफलर आता वापरण्यासाठी काढले आहेत. यंदा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे थंडीदेखील अधिक असण्याची शक्यता आहे.
---------------
हवामान खात्याचा अंदाज म्हणतो....
पुढील ६ दिवस सोलापूरात थंडीची परिस्थिती थोड्याफार फरकाने अशीच राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. २९ डिसेंबरपर्यंत तापमान किमान तापमान १४ ते १२ अंश सेल्सिअस इतके असू शकते असा हवामान खात्याचा अंदाज आहे.