अन चक्क पोलिसांनी उचलला रस्त्यावर पडलेला माल !

वाहतूक पोलिसांचे कौतुक

अन चक्क पोलिसांनी उचलला रस्त्यावर पडलेला माल !

सोलापूर : प्रतिनिधी

रस्त्यावर पडलेला २० लाख रुपये किमतीचा माल उचलून शहर वाहतूक पोलिसांनी संकटात सापडलेल्या ट्रक चालकाला मदत केली. या कामामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.

गुजरातवरून तामिळनाडूच्या वैसुर येथे चाललेला सनमाईकने भरलेला ट्रक (टी एन ५२ एच ६३५७) पाटा तुटल्याने सोमवारी रात्री २ च्या सुमारास गुरुनानक चौक ते महावीर चौकाच्या दरम्यान बंद पडला. यानंतर ट्रक चालकाने क्रेन बोलावण्याचा प्रयत्न केला परंतु क्रेनचालक न आल्याने ट्रक तिथेच थांबून होता. या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर सनमाईक भरले होते. ते एका बाजूला कलंडत असल्याचे दिसताच ट्रकचालक सावध झाला. आणि सकाळी महावीर चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस शैलजा पोतदार यांना या प्रकाराची माहिती दिली. क्रेन येईपर्यंत ट्रकचालक ट्रक जवळ थांबून येथून जाणाऱ्या वाहनधारकांना सावध करत होता. दुपारी १२.३० च्या सुमारास अचानक ट्रकमधील सर्व सनमाईक मोठा आवाज करत ट्रकची एक बाजू पूर्णपणे तोडत रस्त्यावर पडले. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन येथून जात नसल्याने जीवितहानी टळली.

खाली वाचा 

ट्रकमधील सर्व सनमाईक रस्त्यावर पडल्याने रस्ताच बंद झाल्याचे दिसताच वाहतूक पोलीस शैलजा पोतदार यांनी तातडीने वरिष्ठांना कळवले. यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त (वाहतूक) रुपाली दरेकर, वाहतूक पोलीस निरीक्षक संतोष काणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी पोलिसांनी हे आमचे काम नाही असे न म्हणता किंवा इतरांवर अवलंबून न राहता स्वतः च हे सनमाईक उचलण्यास सुरुवात केली. वाहतूक पोलीस निरीक्षक संतोष काणे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक संजीव भोसले, पोलीस उपनिरीक्षक अमित करपे, वाहतूक पोलीस सचिन कुलकर्णी, शैलजा पोतदार, पद्मसिंह चव्हाण, अफरोझ मुलाणी, गणेश साठे, संपत कारबळ यांनी रस्त्यावर पडलेले सनमाईक सुमारे तीन तास काम करून रस्त्याच्या कडेला ठेवत ट्रकचालकाला मदत केली.

यानंतर पोलिसांच्या क्रेनला त्वरित पाचारण करण्यात आले. क्रेन आणि जेसीबी यांच्या साहाय्याने रस्त्यात तुटून पडलेला ट्रक आणि २० लाखांचे सनमाईक बाजूला करण्यात आले. 'कठीण समय येता, पोलिस कामास येतो' या म्हणीचे पुन्हा एकदा प्रत्यंतर यानिमित्ताने समाजाला झाले.

समज ठरवला चुकीचा
वाहतूक पोलीस म्हणजे वाहनधारकांकडून दंड वसूल करणारे पोलिस अशी प्रतिमा असते. मात्र मंगळवारी वाहतूक पोलिसांनी ट्रक चालकाला अशा प्रकारे मदत केली आणि हा समज खोटा ठरवला.
----
ट्रकमधील माल रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद झाला होता आणि ट्रक चालकाला काय करावे ते सुचत नव्हते. त्याला आम्ही पोलिसांनी कर्तव्य भावनेतून मदत केली.
-- संतोष काणे, पोलिस निरीक्षक(वाहतूक)