सोलापूरकरांनो,आनंदाची बातमी !
वाहतूक होणार अंशतः सुरू
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या १४ दिवसांपासून बंद असलेली विजयपूर रेल्वे पूल रस्त्यावरील वाहतूक अंशतः आणि प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. त्यामुळे त्रासापासून वाहनधारकांची काही प्रमाणात का होईना सुटका होणार आहे.
सोमवारी सायंकाळी ५ वाजता पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) रुपाली दरेकर, महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी,
राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी एकत्रित विजयपूर रस्त्यावरील रेल्वे पुलाची पाहणी केली.
उद्यापासून (मंगळवार) सायंकाळी ६ वाजल्यापासून रेल्वे पूलावरची वाहतूक प्रायोगिक तत्त्वावर हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात येणार आहे. पूलाचा अर्धा भाग वापरण्यात येणार आहे, असे पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी सांगितले. यासाठी रेल्वे पूलावरून बॅरिगेटिंग टाकण्यात येणार आहेत.
विजयपूर रस्त्यावरील रेल्वे पूलाच्या खालून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. कामादरम्यान पूल ढासळण्याची शक्यता असल्याने ६ ते २० ऑक्टोबरपर्यंत येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक होटगी रस्त्याकडे, श्री रेवणसिद्धेश्वर मंदिराकडे वळविण्यात आली असल्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
२० ऑक्टोबरची मुदत उद्या (मंगळवारी) संपत असल्यामुळे पोलिस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी कामाचा संयुक्त आढावा घेतला.
दरम्यान, पूलावरून वाहतूक सुरू झाल्यास पूलाखालची माती ढासळू शकते अशी भीती कंत्राटदाराने व्यक्त केली. परंतु हलकी वाहने नेण्यास हरकत नाही यावर सगळ्यांचे एकमत झाल्याने पोलिस प्रशासन, महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या गाड्या पूलावरून फिरवून माती ढासळण्याचे प्रमाण कितपत आहे याचाही प्रयोग करण्यात आला. चर्चेअंती मंगळवार सायंकाळपासून हलकी वाहने सोडण्याचा निर्णय झाला.
----------
जड वाहतूक सुरू होणार ८ दिवसांनी
ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण होण्यास अद्याप वेळ लागणार असल्याने रेल्वे पूलावरून जड वाहतूक सुरू होण्यास अद्याप ८ ते १० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. धाटे यांनी महाबातमी ला सांगितले.
----------
रत्नागिरीहून येणार तज्ञ
पूलाचे काम पुश थ्रू पध्दतीने सुरू आहे. या पूलाच्या पाहणीकरता रत्नागिरी उद्या (मंगळवारी) तज्ञ येणार आहेत. ते पूलावरून वाहतूक पूर्ववत करण्यासाठीच्या उपाययोजना सांगणार आहेत, असे राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी सांगीतले.
--------
बैठकीतील ठळक मुद्दे
१) पूल वाहतुकी दरम्यान ढासळतोय का हे पाहण्यासाठी निरीक्षक नेमणार
२) पूलावरून बॅरीगेटिंग करून वाहतूक होणार सुरू
हलकी वाहनेच सोडणार
३) कामात नियोजन दिसत नसल्याने पोलिस उपायुक्त डॉ. धाटे यांनी कंत्राटदाराला घेतले फैलावर