घरमालकांनो सावधान ! पोलिसांना त्वरीत द्या 'ही' माहिती
पोलीस आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील घर मालकांसाठी महत्त्वाचा आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी गुरुवारी सायंकाळी जाहीर केला आहे. या आदेशानुसार ज्या घरमालकांनी भाडेकरू ठेवलेले आहेत अशांनी आपल्या भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे तत्काळ सादर करायची आहे.
दहशतवादी, समाजकंटक, विध्वंसक कार्य करणाऱ्या समाज विघातक शक्ती भाडेकरूंच्या रुपात समाजात राहत असण्याची शक्यता गृहीत धरता अशा व्यक्तींमुळे शहराच्या शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता असते. अशा व्यक्तींकडून विध्वंसक कृती, दंगली, भांडणे होऊ नयेत यासाठीची प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हा आदेश शनिवार, 5 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार असल्याचे गुरुवारी सायंकाळी जाहीर केले.
ज्या जागा मालकांनी भाडेकरू ठेवलेले आहेत अशा सर्वांनी भाडेकरूंची माहिती संबंधित हद्दीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे द्यावी तसेच महत्त्वाचे म्हणजे परदेशी नागरिक जर भाड्याने रहात असतील तर संबंधित घराच्या मालकाने स्वत:ची माहिती आणि भाडेकरूचे नाव, नागरिकत्व, पासपोर्टची माहिती, पासपोर्ट क्रमांक, पत्ता, दिनांक, वैधता, व्हीसाची माहिती, व्हीसा क्रमांक, नोंदणी स्थळ आणि शहरात राहण्याचे कारण ही सर्व माहिती संबंधित हद्दीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे द्यावयाची आहे.
पोलीस आयुक्तांच्या या आदेशाचे भंग करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान 188 प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी सांगितले. ही माहिती आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी ६० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. तथापि नागरिकांनी त्वरित माहिती सादर करावी असेही पोलिस आयुक्तालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.