ऑनलाइन व्यवहार करताना सावधान !

पोलिसांनी दिला गंभीर इशारा

ऑनलाइन व्यवहार करताना सावधान !

सोलापूर : प्रतिनिधी

आपण ऑनलाइन व्यवहार करत असाल तर सावधान...! सोलापूर शहर पोलिसांनी ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. ऑनलाइन केवायसीच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन सोलापूर पोलीस आयुक्तालयाने केले आहे.

वाढत्या ऑनलाइन फसवणुकीमध्ये केवायसीच्या नावाखाली येणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ऑनलाइन पद्धतींने सेवांचा वापर करून व्यवहार करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र या डिजिटल क्रांतीसोबत ऑनलाइन पद्धतीत सायबर गुन्हेगारीचा शिरकावदेखील मोठ्या प्रमाणात झाला आहे. ग्राहक अनेकदा ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. याचाच फायदा घेऊन ऑनलाइन फसवणूक करणारे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फसवत आहेत.

एसएमएस, व्हाट्सअपच्या मार्फत ग्राहकांना संदेश पाठवण्यात येतो. ज्यामध्ये ग्राहकांना स्वतःची केवायसी अपडेट करण्यास सांगितले जाते. केवायसी अपडेट न केल्यास मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड नंबरची सेवा स्थगित होईल, असे त्या संदेशात नमूद असते. या संदेशात सोबत एक लिंकही पाठवण्यात येते. याचा वापर करून केवायसी अपडेट करण्याबाबत सूचना दिली जाते. अनेकदा ग्राहक पुरेशा माहिती अभावी अशा फसव्या संदेशाला बळी पडून विश्वास ठेवतात. आणि लिंक ओपन करून आपला मोबाईल नंबर, बँक खाते आदी माहिती अचूकपणे त्यात भारतात. तसेच ओटीपी क्रमांकही भरतात. यानंतर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीकडून विविध ॲपच्या माध्यमातून ग्राहकाची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ग्राहकांनी जागृत राहून काळजीपूर्वक ऑनलाइन व्यवहार करणे आवश्यक आहे, असे पोलीस आयुक्तालयाने सांगितले आहे.

कोणतीही बँक, मोबाईल ऑपरेटर कंपनी किंवा अन्य अशा संस्था आपल्या ग्राहकांना कधीही केवायसी अपडेशनकरिता एसएमएस किंवा व्हाट्सअप संदेश पाठवून किंवा अन्य पद्धतीने संपर्क करून व्यक्तिगत माहिती भरण्यास सांगत नाही. त्यामुळे ग्राहकांनी अशा फसव्या संदेशाला बळी पडून माहिती भरू नये तसेच असा प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ सायबर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा तसेच संबंधित बँकेला याबाबत कळवावे, असे आवाहन सोलापूर पोलीस आयुक्तालयाने केले आहे.