सोलापूरच्या अभियंत्याने तयार केली सोलापूर मेट्रोची योजना

केंद्र शासनास करणार सादर

सोलापूरच्या अभियंत्याने तयार केली सोलापूर मेट्रोची योजना

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरच्या भूमिपुत्राने सोलापूरच्या विकासाचा एक शतकाचा मोठा टप्पा डोळ्यासमोर ठेवून या शहरासाठी सोलापूर मेट्रो ही क्रांतिकारक योजना तयार केली आहे. मूळचे सोलापूरचे असलेले सुनीलकुमार शिंदे यांनी गेली दोन ते तीन वर्षे या योजनेचा तपशीलवार अभ्यास केला आहे. या योजनेची  माहिती त्यांनी मंगळवारी  पत्रकारांना ध्वनिचित्रफितींच्या माध्यमातून दिली. 

श्री. शिंदे हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले जागतिक कीर्तीचे तज्ञ असून त्यांचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरात आणि अभियांत्रिकीचे शिक्षण सांगलीच्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीतून झालेले आहे.

व्यवसायाच्या निमित्ताने जगभर फिरताना त्यांना अनेक शहरांचा विकास मेट्रो रेल्वे मुळे कसा झाला हे पहायला मिळाले. त्यामुळे आणि विशेषत: अमेरिकेतल्या शिकागो शहरातल्या मेट्रो सेवेमुळे ते प्रेरित झाले. सोलापूरचा विकास मेट्रोमुळे कसा होईल याचा विचार करताना त्यांंना शहरासोबतच लगतचा ग्रामीण भागही मेट्रोला जोडण्याची कल्पना सुचली. त्यातूनच सोलापूर मेट्रो हा वेगळा पॅटर्न त्यांनी तयार केला आहे.

या सोलापूर मेट्रोने सोलापूर शहर पंढरपूर, अक्‍कलकोट, तुळजापूर, एनटीपीसी, बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिर्‍हे, सोरेगाव, ही सात केंद्रे जोडली जातील. १०१ मेट्रो स्थानके आणि सोलापुरातला वर्तुळाकार मुख्य मार्ग अशी ही सोलापूर मेट्रो २२० किलोमीटर्
लांबीची असेल अशी माहिती श्री. शिंदे यांनी दिली. या मेट्रोमुळे शहराचा आणि लगतच्या या ग्रामीण भागाचाही विकास होईल असा दावा त्यांनी केला.

सोलापूर मेट्रो ही केवळ सोलापूर शहरासाठी नाही. तो एक पॅटर्न आहे आणि जगभरातल्या, सोलापूरसारख्या कोणत्याही बी ग्रेड शहराच्या विकासाला चालना देणारा आहे. भारत सरकारने २०१७ साली मेट्रो नीती जाहीर केली असून मेट्रोमुळे शहराचे अनेक प्रश्‍न सुटू शकतात हे या मेट्रो नीतीत दाखवून दिले आहे. असे असले तरी भारत सरकार बी ग्रेड शहरांचा समावेश मेट्रो शहरात करीत नाही. म्हणून अशा शहरांना लागू पडेल अशी ही योजना श्री. सुनीलकुमार शिंदे यांनी तयार केली आहे.
 
पुणे आणि नागपुरात आता रस्ते तीन मजली झाले आहेत आणि तिसर्‍या मजल्यावरून मेट्रो रेल्वे चालवली जात आहे. सोलापूर मेट्रो तशीच असेल म्हणजे तिच्यासाठी वेगळी जमीन संपादन करावी लागणार नाही. सोलापुरात होणार असलेल्या दोन उड्डाण पुलांच्या रचनेत काही बदल मात्र करावे लागतील, असे श्री. सुनीलकुमार शिंदे म्हणाले.

या योजनेत शिंदे यांनी, कार्गो मेट्रोची नवी संकल्पना मांडली आहे. म्हणजे या मार्गावर माल वाहतूकही करता येईल.  त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातला शेतीमाल शहरात सहजतेने आणता येईल. आगामी काळात सूरत ते चेन्‍नई हा महामार्ग सोलापूरहून जाणार आहे. तसेच हैदराबाद ते मुंंबई ही बुलेट ट्रेनही सोलापूर जिल्हतून जाणार आहे. सोलापूर मेट्रोच्या मार्गावरची सगळी गावे मेट्रोमुळे  वेगवान वाहतुकीच्या या दोन साधनांशी जोडली जातील.

श्री. सुनीलकुमार शिंदे यांनी सांगितले की, या मेट्रोची रचना आणि मार्ग असा वैशिष्ट्यपूर्ण आहे की, मार्गावर स्थानक असलेल्या प्रत्येक गावाहून या २२० किलोमीटर मार्गावरच्या कोणत्याही गावाला सहजतेने आणि वेगाने जाता येईल. शिवाय प्रत्येक स्थानकावर इलेक्ट्रिक वाहनाची सेवा बहाल केली जाईल ज्यामुळे स्थानकापासूनचे पाच किलो मीटर अंतरावरचे कोणतेही गाव मेट्रोच्या कॅचमेंट एरियात येईल. लास्ट माईल कनेक्टिव्हिटीच्या तत्त्वाने मोठा भाग मेट्रोशी जोडला जाईल.

या मार्गावर २२० किलोमीटर लांबीची समांतर जलवाहिनी टाकण्याचीही योजना शिंदे यांनी आखली आहे. मेट्रोचे चलनवलन प्रामुख्याने सौरऊर्जेवर होईल. मार्गावर २४ तास वाय फाय सेवा आणि विकसित स्थानके, त्यावरची अद्ययावत पार्किंग सेवा, शहराच्या मेट्रो मार्गावर अनेक विकास केन्द्रे अशी काही वैशिष्ट्ये त्यांनी स्पष्ट केली. सोलापूर मेट्रोच्या मार्गांना वैशिष्टपूर्ण नाव देण्याची कल्पनाही या योजनेत आहे. असे ते म्हणाले.

सोलापूर मेट्रोची रचना आणि योजना केन्द्र सरकारच्या मेट्रोधोरणांशी सुसंगत असल्यामुळे या योजनेला केन्द्राची मंजुरी आणि मदत मिळण्याची खात्री आहे. ही योजना जगातल्या कोणत्याही बी ग्रेड शहराची मेट्रो योजना असेल. तिचे डबे, रूळ आणि अनेक प्रकारची यंत्रसामुग्री वेगळ्या प्रकारची असल्याने त्यांचे उत्पादन करण्याचा नवाच उद्योग भारतात उदयाला येईल. शिवाय अनेक शहरांना तिचा पुरवठा आपण  करू शकू, त्यातून मोठी रोजगार निर्मिती होईल असा विश्‍वास सुनीलकुमार शिंदे यांनी व्यक्‍त केला.

या कल्पनेचे पेटंट घेण्यासाठी अर्ज केला असून तो संबंधित यंत्रणेने स्वीकारला आहे. या योजनेची पूर्तता करताना अनेक नवे विक्रम होणार आहेत. ही जगातली २२ व्या क्रमांकाची तसेच भारतातली तिसर्‍या  क्रमांकाची लांब अंतराची मेट्रो रेल्वे असेल. ती वर्षातले ३६५ दिवस आणि २४ तास सेवा देणारी मेट्रो असेल. या सगळ्या वैशिष्ट्यांसह पेटंटसाठी अर्ज केला आहे अशी माहिती शिंदे यांनी दिली. या पत्रकार परिषदेसाठी ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, मोशन फिल्म स्टुडिओचे सचिन जगताप आदी उपस्थित होते.