महानगरपालिकेने थकबाकीदारांना दिले 'अभय'
थकीत करावरील शास्तीवर ८० टक्क्यांपर्यंत सवलत
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेतर्फे कर थकबाकीदारांसाठी 'अभय योजना' जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शहरातील ज्या कर थकबाकीदारांच्या थकीत करांवरती शास्ती लावण्यात आली आहे, अशा थकबाकीदारांनी नोव्हेंबर महिन्यात मालमत्ता कर भरल्यास ८० टक्के शास्तीकर तर डिसेंबर महिन्यात मालमत्ता कर भरल्यास ७० टक्के व जानेवारी महिन्यात मालमत्ता कर भरल्यास ६० टक्के आणि मार्च महिन्यात मालमत्ता कर भरल्यास ५० टक्के करावरील शास्तीवर सवलत देण्यात येणार आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. आणि महानगरपालिकेच्या देखील आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे साहजिकच महापालिकेच्या कर संकलनावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर जाहीर केलेली ही योजना थकबाकीदारांसाठी संधी ठरणार आहे.
सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी ज्यांचे मालमत्ता कर थकीत आहेत, त्यांनी नोव्हेंबर महिन्यात भरावे. मालमत्ता कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा. कोरोनाचा पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आर्थिक बळकटीकरणासाठी मदत होईल, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.