मग जिल्ह्यातील 'ते' १४२ कोरोना रुग्ण गेले कुठे ?
मृत्यूंची नोंदही चुकीची
सोलापूर : प्रतिनिधी
शासनाच्या दोन कार्यालयांमध्ये समन्वय नसल्याची अनेक उदाहरणे आपल्याला आढळतात. मात्र यंदा शासनाच्या दोन कार्यालयांनी मिळून तब्बल १४२ कोरोना रुग्णच गायब केले की काय अशी शंका येत आहे. दोघांची आकडेवारी योग्य असेल तर ते १४२ रुग्ण गेले कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे विभागाचे आयुक्त सौरभ राव यांनी २ नोव्हेंबर रोजी पर्यंतची कोरोना रुग्णांची एकूण आकडेवारी जिल्हानिहाय जाहीर केली. यात सोलापूर जिल्ह्यात आजवर ४० हजार ८९४ रुग्ण आढळून आल्याचे म्हटले आहे. मात्र सोलापूर महानगरपालिकेने शहर हद्दीत ९ हजार ६३२ रुग्ण आढळल्याचे सांगितले तर जिल्ह्यात ३१ हजार ४०४ रुग्ण आजवर आढळले आहेत असे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. या दोन्ही आकड्यांची बेरीज ४१ हजार ३६ इतकी येते. तर विभागीय आयुक्तांनी दिलेला आकडा ४० हजार ८९४ इतका आहे. यात तब्बल १४२ रुग्णसंख्येचा फरक दिसून येत आहे.
बरे झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीतही १०५ इतकी तफावत आहे. सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात ३७ हजार ४०८ रुग्ण बरे झाले आहेत. तर विभागीय आयुक्तांनी दिलेली माहिती खरी समजली तर आजवर ३७ हजार ३०३ रुग्ण बरे झाले आहेत.
२ नोव्हेंबर रोजी असलेल्या बाधित रुग्ण संख्येचा मेळ देखील दिसत नाही. विभागीय आयुक्त म्हणतात त्यानुसार ऍक्टिव्ह रुग्णसंख्या २ हजार १२७ आहे तर मनपा आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने दिलेल्या आकड्यांची बेरीज २ हजार १५९ येते. यातही ३२ चा फरक आहेच.
मृत्यूंचीही नोंद चुकीचीच
सोलापूर शहर हद्दीत ५३७ मृत्यू झाल्याची नोंद आहे तर जिल्ह्यात ९३२ मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीत मृत्यू संख्येचा आकडा ५ ने कमी आहे. त्यामुळे इतर आकडेवारीत झालेला घोळ मृत्यूच्या आकड्यांमध्येही दिसत असल्यामुळे हे गंभीर आहे.
-----
नियमित वाचा महाबातमी
संपर्क :- पुरुषोत्तम कारकल
९८६०८२२२८३