रेल्वे स्थानकावर अनोख्या प्रदर्शनाचे झाले उद्घाटन

काय आहे प्रदर्शन ? वाचा !

रेल्वे स्थानकावर अनोख्या प्रदर्शनाचे झाले उद्घाटन

सोलापूर : प्रतिनिधी

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या वीर स्त्री-पुरुषानी प्राण पणाला लावून काम केले त्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्थान अग्रगण्य आहे. केवल स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच त्यांनी परिश्रम घेतले नाहीत, तर त्यांनी भारतातील अनेक संस्थाने एकत्र आणून भारतीय स्वातंत्र्याला बळकटी आणली. देशसेवा करण्याची इच्छा असणा-या प्रत्येक भारतीयांसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन म्हणजे एक प्ररेणास्त्रोत आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. मध्य रेल्वे, सोलापूर विभाग आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने “राष्ट्रीय एकता दिवस” निमित्त सरदार से लोहपुरुष जीवनप्रवासातील माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.

 एकसंघ भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार पटेल यांची जयंती केंद्र शासनाच्या वतीने “एकतेचा उत्सव” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने सोलापूर रेल्‍वे स्‍टेशन येथील जनरल तिकीट खिडकीजवळ दि. ३० व ३१ ऑक्टोबर या कालावधीत सरदार से लोहपुरुष यांच्या जीवन प्रवासाची माहिती देणा-या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे.

यावेळी हैदराबाद मुक्ती संग्रमातील स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रेय हिबारे, जिल्‍हाधिकारी मिलिंद शंभरकर, विभा‍गीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापक नीरज कुमार दोहरे, पोलिस आयुक्‍त डॉ. राजेंद्र माने, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी जी. पी. भगत, विभागीय सुरक्षा आयुक्त ए. नवीन कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. राणेयेवले, विभागीय सुरक्षा अधिकारी शिवाजी कदम, विभागीय वित्त व्यवस्थापक विवेक होके, विभागीय सिग्नल व टेलिकम्युनिकेशन अभियंता राहुल गौड़, सोलापूर स्टेशन व्यवस्थापक सुशील कुमार सिंह, क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव आणि निवृत्त अधिकारी सतीश घोड़के आदि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शंभरकर म्हणाले, सरदार पटेल यांच उतुंग व्यक्तिमत्व आणि भारताला एकसंघ करण्यासाठी त्यांनी केलेल्या नियोजनबद्ध कार्याची माहिती आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे.

पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल नव्या भारताचे निर्माते आणि कुशल संघटक होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन व आभार सचिन बनसोड़े यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी मध्य रेल्वे सोलापूर विभागचे सर्व अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय संचार ब्युरोचे कार्यालय सहायक जे. एम. हन्नुरे, स्कायविंग इवैंट अँड एंटरटेनमेंटचे संचालक योगी कोंडाबत्तीनी, सूरज जाधव आदींनी सहकार्य केले.