सोलापूर लोकसभेचा रंगू लागला आखाडा

भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या राजकिय संघर्षाला चढू लागली धार : खासदार हरवल्याची दिली तक्रार

सोलापूर लोकसभेचा रंगू लागला आखाडा

सोलापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीला काहीसा अवधी असला तरी सोलापूर लोकसभेचा राजकीय आखाडा आता रंगू लागला आहे. विशेषतः भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या राजकीय संघर्षाला आता अधिक धार चढू लागली आहे. 'सोलापूरचे खासदार हरविले असून ते आम्हाला शोधून द्या' असे निवेदन शिवसेना ठाकरे गटाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यामुळे सोलापूर लोकसभा क्षेत्रात हा चर्चेचा विषय झाला आहे.

'जिल्हाधिकारी साहेब, आमचे खासदार गायब झाले आहेत. त्यामुळे विकासकामे होत नाहीयेत. त्यामुळे कृपया आमचे खासदार आम्हाला शोधून द्या', अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामींच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या या अनोख्या निवेदनाने सोलापुरात चर्चेला उधाण आले आहे.

विकासकामे सुचवण्यासाठी अनेक नागरिक खासदारांची भेट घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून खासदार नागरिकांना भेटत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे खासदार हरवले असून त्यांचा शोध घेण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा हा कायम दुष्काळजन्य परिस्थिती असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात पाणी, उद्योग, शेती, शिक्षण, रस्ते, रोजगार अशा अनेक क्षेत्रातील समस्या आहेत. जनतेच्या या समस्या सोडवण्याची नैतिक जबाबदारी सोलापूर लोकसभेचे लोकप्रतिनिधी म्हणून खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्यावर आहे. मात्र आमचे खासदार हरविले असल्याने त्यांच्याशी जनतेचा संपर्क होऊ शकत नाहीये.

सोलापूर जिल्ह्यात नागरिकांच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण झालेल्या नाहीत. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असतानाही अहवालात चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. याकडे खासदार महोदयांचे लक्ष नाही. कारण ते कुठे तरी हरविले आहेत की काय अशी भिती आम्हा जनतेला वाटत आहे. त्यांचे अपहरण झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

सत्ताधारी खासदार असूनही सोलापूरसाठी काहीही ठोस काम न करणारे खासदार सर्वसामान्य जनतेला भेटतदेखील नाहीत. आपल्या अकार्यक्षमतेमुळे जनतेच्या तीव्र नाराजीपासून वाचण्यासाठी त्यांना जणू भूमिगत व्हावे लागले आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

खासदार हे एका मठाचे मठाधिपती आहेत. परंतु मठात पण नाही अन् जनतेत पण नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे. आम्ही नागरिकांनी विकासकामे सांगण्यासाठी अनेकदा त्यांचा शोध घेतला परंतु ते आम्हाला मिळाले नाहीत. जनतेने विश्वासाने निवडून दिलेले खासदारच गायब झाले तर जनतेने दाद कोणाकडे मागायची ? त्यामुळे आमचे हरवलेले खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांचा त्वरीत शोध घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.

यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, सहसंपर्कप्रमुख माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, सोलापूर लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर, उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, शहर प्रमुख दत्तात्रय वानकर, शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर, दक्षिण विधानसभा प्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, शहर उत्तर विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड, युवासेना जिल्हा संघटक बालाजी चौगुले, युवती सेना शहर संघटिका पूजा खंदारे, कॉलेज कक्ष जिल्हाप्रमुख तुषार अवताडे, उपजिल्हा संघटिका मीना सुरवसे, उपजिल्हा संघटिका मीनल दास, उपजिल्हा संघटिका प्रीती नायर आदी उपस्थित होते.