ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील विधींना उद्या होणार प्रारंभ
राजशेखर हिरेहब्बू यांची माहिती : जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता विधी ?
सोलापूर : प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील विधींना उद्या गुरुवार, दि. ११ जानेवारी रोजी प्रारंभ होणार असून दरवर्षीप्रमाणे योगदंड पूजन, नंदीध्वजास साज चढविणे, तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होम प्रदीपन, दारूकाम, नंदीध्वजांचे वस्त्र विसर्जन हे धार्मिक विधी होणार असल्याची माहिती ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महायात्रेचे पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवार, ११ जानेवारी रोजी वाढदिवसाच्या पूजा शेटे वाड्यात होणार आहे. गुरुवार, १२ जानेवारी रोजी रात्री १२.०५ वाजता हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजास साज चढविण्याचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार, दि. १३ जानेवारी रोजी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक करुन धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक सकाळी ८ वाजता हिरेहब्बू वाड्यापासून सुरुवात होणार आहे.
शनिवार, दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता हिरेहब्बू वाड्यापासून नंदीध्वज मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात आल्यानंतर संमती कट्ट्यावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा होणार आहे.
रविवार, दि. १५ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी होम मैदानावर होमप्रदीपनाचा समारंभ होणार आहे. सोमवार, दि. १६ जानेवारी रोजी किंक्रांत असून त्यादिवशी होम मैदानावर शोभेचे दारूकाम होणार आहे. तर मंगळवार, दि. १७ जानेवारी रोजी नंदीध्वजांच्या वस्त्रविसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे.
या पत्रकार परिषदेस यात्रेचे मानकरी आणि आमदार विजयकुमार देशमुख मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, प्रथमेश हिरेहब्बू, ओंकार हिरेहब्बू, सर्वेश हिरेहब्बू, यश हिरेहब्बू, सुदेश देशमुख, मल्लिनाथ मसरे, सुधीर थोबडे, संदेश उघडे, सोमनाथ मेंगाणे, भीमाशंकर म्हेत्रे, भीमाशंकर कुंभार, योगीनाथ इटाणे, चिदानंद मुस्तारे तसेच विविध नंदीध्वजांचे मास्तर उपस्थित होते.
----------------
नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील अडथळ्यांबाबत प्रशासनाची चर्चा
नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील अडथळ्यांबाबत प्रशासनाची चर्चा करण्यात आली असून महापालिका आणि पोलीस आयुक्त यांच्याशी बोलणी सुरू आहेत. याबाबत पुन्हा एकदा पाहणी करून अडथळे दूर करण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करण्यात येणार आहे, असे राजशेखर हिरेहब्बु यांनी सांगितले.