शिक्षण, वैद्यकीय आणि रोजगाराच्या प्रश्नांची करणार सोडवणूक
युवा सेनेचे नूतन जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले यांचा सत्कार
सोलापूर : प्रतिनिधी
युवा सेनेच्या माध्यमातून शिक्षण, वैद्यकीय आणि रोजगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही युवा सेनेचे नुतन जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले यांनी दिली. युवा सेनेच्यावतीने जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल पार्क चौकातील युवासेनेच्या कार्यालयासमोर बुधवारी युवासेनेचे माजी शहर युवा अधिकारी विठ्ठल वानकर यांच्या हस्ते बालाजी चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जल्लोषही करण्यात आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आदित्य ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले सत्काराला उत्तर देताना म्हणाले, आज राज्यातील सरकारमध्ये जे काही गलिच्छ राजकारण सुरू आहे ते महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. परंतु या जरी घडामोडी राज्यात घडत असल्या तरी महाराष्ट्रातील व सोलापुरातील शिवसैनिक हा निष्ठेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार आहे. कोणी शिवसेना सोडल्यामुळे पक्षाला काहीही फरक पडत नाही. राहिले आहेत ते मावळे आहेत आणि गेले आहेत ते कावळे आहेत, अशी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करत आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी युवा सेना जोमाने कामाला लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूरची युवासेना आता नव्या दमाने कामाला लागली आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर आणि जिल्ह्यात युवा सेना मजबूत करण्यावर भर राहणार असल्याचे सांगत सामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी युवा सैनिक रस्त्यावरची लढाई लढण्यासाठीसुद्धा मागेपुढे पाहणार नसल्याचे बालाजी चौगुले यांनी सांगितले.
यावेळी योगेश भोसले, गुरुनाथ शिंदे, प्रसाद नीळ, अमर बोडा, खंडू सलगरकर, काशिनाथ विभुते, राहुल गंधुरे, मल्लिनाथ कारमपुरी, अर्जुन गायकवाड, विष्णू जगताप, संकेत गोटे, विशाल पवार, संदीप हंचाटे, पांडुरंग माळगे, मनोहर दोंतुल, मनोज शावंतुल, उपेंद्र मेरगु, अक्षय बारामतीकर यांच्यासह युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------
निष्ठावंत शिवसेनेशी एकनिष्ठच
राज्यातील निष्ठावंत सेनेशी एकनिष्ठच राहिले आहेत. गद्दार लोकच गेले आहेत. गद्दारांच्या पाठीमागे महाराष्ट्रातला एकही शिवसैनिक नाही. बाळासाहेबांनी मजबूत अशा पद्धतीने संघटनेची बांधणी केली आहे.जे गेले आहेत ते आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी गद्दार फुटून गेलेले आहेत. त्यांच्या पाठीमागे अद्याप शिवसेना नाही. शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार चालणारी संघटना असल्याने आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी राहणार आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूर युवा सेनेला ग्रहण लागले होते .ते ग्रहण आता सुटले असून युवा सेनेने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला आहे. यापुढे युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली अतिशय जोमाने आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असेल.
-- विठ्ठल वानकर, माजी शहर युवा अधिकारी, युवा सेना सोलापूर
------------------------------------