तब्बल ५५ हजार रुपये देऊनही मिळेना कोरोनावरील 'हे' इंजेक्शन
रेमडेसिव्हीर इंजेक्शननंतर आता 'टोसिलीझुमॅब' चा तुटवडा
सोलापूर : प्रतिनिधी
कोरोना रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन च्या तुटवड्याने आधीच रुग्णांचे नातेवाईक बेजार झालेले असताना आता 'टोसिलीझुमॅब' या इंजेक्शन चा तुटवडा निर्माण झाला आहे.
रेमडेसिव्हीर हे इंजेक्शन कोरोना झालेल्या रुग्णाला कोव्हिड संसर्ग कमी करण्यासाठी दिले जाते. तर
'टोसिलीझुमॅब' हे इंजेक्शन कोरोना झालेल्या रुग्णाचा न्यूमोनिया कमी करण्यासाठी देण्यात येते.
'टोसिलीझुमॅब' या इंजेक्शनची मूळ किंमत ३३ हजार ५०० रुपये आहे. मात्र सध्या या इंजेक्शन चाही राज्यात काळाबाजार सुरू असून हे इंजेक्शन सध्या तब्बल ५५ हजार रुपयांना विकले जात आहे. मात्र रविवारपासून याचाही प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.
रुग्णांचे नातेवाईक ५० - ५५ हजार रुपये खिशात घेऊन फिरत आहेत पण इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मागीलवर्षी काही दिवस पुरेसा साठा नसल्याने हे इंजेक्शन सोलापूरात मिळत नव्हते. तेंव्हा रुग्णांनी नांदेड, बारामती, लातूर येथून तब्बल ४४ हजार रुपये, ५२ हजार रुपये देऊन इंजेक्शन मिळवले होते. यंदा या इंजेक्शनचा सध्या मोठा तुटवडा जाणवत आहे. यंदा ५५ हजार रुपये देऊन अनेक रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
याप्रश्नी प्रशासनाने तात्काळ पावले उचलून गरजू रुग्णांना 'टोसिलीझुमॅब' इंजेक्शन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
---------------------------------
प्रशासन म्हणते उपलब्ध नाही
'टोसिलीझुमॅब' च्या तुटवड्याबद्दल विचारले असता निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी केवळ 'सध्या उपलब्ध नाही' इतकेच उत्तर दिले. एकीकडे रुग्णांच्या नातेवाईकांकडून ५० - ५५ हजार रुपये घेऊन इंजेक्शन दिले जात आहे. आता तर ते ही इंजेक्शन मिळत नसल्याचे चित्र आहे. ज्या प्रशासनाने गरजेच्या वेळी इंजेक्शन मिळवून देणे अपेक्षित असते त्या प्रशासनाकडून फक्त सध्या उपलब्ध नाही असे सांगण्यात येत असल्याने रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत.