अन् सोलापूरची बाप्पांची मूर्ती पोहचली थेट अमिताभ बच्चन यांच्या घरी !
शिल्पकार भगवान रामपुरे यांचा अविष्कार
पुरूषोत्तम कारकल
गणपती बाप्पांची मूर्ती हा आपल्या सर्वांसाठीच अत्यंत आवडीचा विषय. बाप्पांची अधिकाधिक लोभस मूर्ती घरी आणावी यासाठी आपण धडपडत असतो. अशाच धडपडीतून महानायक अमिताभ बच्चन यांना एक बाप्पांची मूर्ती आवडली आणि थेट सोलापूरात फोन आला.....अन् सोलापूरचे जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी बनविलेली बाप्पांची मूर्ती थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी विराजमान झाली !
दाक्षिणात्य चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्री कुमार यांच्या एका चित्रपटासाठी बिग बी अमिताभ बच्चन हे मुंबईतील एका स्टुडीओत फोटोशुटींग करत होते. या स्टुडीओत दर्शनी भागात ठेवलेली बाप्पांची मूर्ती पाहून ते हरकून गेले. गणेशाची अनेक रूपे आहेत. अनेक आकारांमध्ये गणपती बाप्पा अनेकांनी साकारला आहे. परंतु अशा प्रकारची मूर्ती ते प्रथमच पाहत होते. पाहताक्षणीच त्यांनी या मूर्तीबद्दल आणि मूर्तीकाराबद्दल चौकशी केली. मला ही मूर्ती कोणत्याही परिस्थितीत हवीच आहे, असेही बिग बींनी सांगितले.
सोलापूरचे जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी स्वतः बनविलेली ही मूर्ती मुंबईच्या त्या छायाचित्रकार मित्रास भेट म्हणून दिली होती. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः अशी मूर्ती मागितल्याने त्या छायाचित्रकार मित्राने त्वरीत शिल्पकार भगवान रामपुरे यांना फोन लावून मूर्ती हवी असल्याचे कळविले. यानंतर भगवान रामपुरे यांनी तीन फूटांची बाप्पांची मूर्ती तयार करून अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी ठेवण्यासाठी मित्राकडे पाठवून दिली.
पाहता पाहता ही मूर्ती इतकी लोकप्रिय झाली की अनेक सेलिब्रिटींसह उद्योगपती, कलाकारांनी ही मूर्ती आपल्या संग्रही ठेवली आहे. बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षयकुमार, ऋषी कपूर यांनी ही मूर्ती खरेदी केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनीही या मूर्तीचे कौतुक केले. याशिवाय जर्मनी, अमेरिका, सिलीकॉन व्हॅली, कॅनडा या देशांमधील भारतीयांनीही या मूर्तीला मोठी पसंती दिली आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियातील हिंदू संस्कृतीच्या संग्रहालयात ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. ही सोलापूरकरांसाठीच नव्हे तर समस्त भारतीयांसाठी अभिमानाचीच बाब म्हणावी लागेल.
-------------
ही आहे मूर्तीची संकल्पना
भारतीय संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे देव कणांकणात वसलेला आहे. निराकार देवाला आकार देत आपण मूर्तीचे स्वरूप दिले आहे. त्या शून्यत्वाच्या पोकळीची संकल्पना जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी या गणेशमूर्तीत उतरविली आहे.