उद्योगवर्धिनी परिवार संध्या कार्यक्रम शनिवारी
चंद्रिका चौहान : उत्कृष्ट सेवेबद्दल १० जणांचा होणार सत्कार
सोलापूर : प्रतिनिधी
उद्योगवर्धिनी संस्थेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता.२३) उद्योगवर्धिनी परिवार संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उत्कृष्ट सेवेबद्दल संस्थेतील ९ महिला आणि एक रिक्षाचालक अशा एकूण १० जणांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी (ता.२३) सायंकाळी ५.३० वाजता शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहात हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका व निरूपणकार स्नेहा शिनखेडे तसेच वास्तुविशारद सिमांतीनी चाफळकर उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योजक रंगनाथ बंग असतील. यावेळी अलका कोरे, अनिता कोरे, वासंती साळुंखे, विजया नलावडे, वैष्णवी पवार, उषा लोहिया, निलावती ढगे, महानंदा माळी, शिल्पा भिंगे, शरणय्या हिरेमठ यांचा सन्मान होईल.
संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान म्हणाल्या, उद्योगवर्धिनी संस्थेला यंदा १८ वर्षे पूर्ण होत आहेत. मागील १८ वर्षात उद्योगवर्धिनी संस्थेकडून सर्वसामान्य महिलांना रोजगाराच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. 'उद्योगवर्धिनी' च्या माध्यमातून स्वावलंबी झालेल्या महिला हेच उद्योगवर्धिनी संस्थेचे यश आहे. या कौतुक सोहळ्यास सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही संस्थेच्या सचिवा मेधा राजोपाध्ये यांनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेस उद्योगवर्धिनीच्या जेष्ठ संचालिका शांता टाके, वर्षा विभुते, सुलोचना भाकरे
आदी उपस्थित होते.