सोलापुरातील पहिल्या शिवसैनिकाचे निधन

आज रात्री होणार अंत्यसंस्कार

सोलापुरातील पहिल्या शिवसैनिकाचे निधन

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शिवसेनेची स्थापना करणारे शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख बाबुराव वडणे यांचे आज गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी होते. १९६६ साली मुंबई येथे शिवसेनेच्या स्थापनेच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती, असे ज्येष्ठ शिवसैनिक शिवा ढोकळे यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' ला सांगितले.

प्रारंभीच्या काळात मराठीचा आणि त्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन बाबुराव वडणे यांनी शिवसेनेच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या निधनामुळे शिवसैनिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बाबुराव वडणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज गुरूवारी रात्री ८ वाजता काडादी शाळेच्यामागील होमकर नगरमधील निवासस्थानापासून निघणार असून त्यांच्यावर रूपाभवानी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
-----------

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत पक्षविस्ताराचे काम बाबुराव वडणे यांनी सोलापूर आणि परिसरात केले. त्यांनी प्रारंभीच्या काळात केलेल्या कार्याचा परिणाम म्हणून शिवसेनेचे चार आमदार जिल्ह्यामध्ये निवडून आले. अतिशय कष्टाळू, प्रामाणिक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

---- प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना

-------
बाबुराव वडणे हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले ज्येष्ठ शिवसैनिक होते. पक्षावर कितीही संकटे आली तरी त्यांनी पक्ष न सोडता ठामपणे पक्षाचे काम केले. त्यांच्या शिवसेना पक्षाविषयीच्या निष्ठा अढळ होत्या. त्यांच्या जाण्याने शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे.
--- पुरुषोत्तम बरडे, लोकसभा क्षेत्रप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
--------