आता आ. प्रणिती शिंदे समर्थकांची आ. विजय देशमुख यांच्यावर टीका

सोलापूरात पेटले सोशल मीडियावर 'मेसेज वॉर'

आता आ. प्रणिती शिंदे समर्थकांची आ. विजय देशमुख यांच्यावर टीका

सोलापूर : प्रतिनिधी

चिमणी पाडकाम प्रकरणावरून चिमणीचे समर्थन करीत नागरी विमानसेवा सुरू करण्याचे आव्हान भाजपला देणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांना अप्रत्यक्षपणे संबोधून सर्वसामान्य सोलापूरकरांनी केलेल्या आरोपाचा  मेसेज व्हायरल झाला. यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांची बाजू घेत माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर टीका करणारा मेसेज आमदार प्रणिती शिंदे समर्थकांनी व्हायरल केला आहे.

काय म्हटले आहे या मेसेजमध्ये ? वाचा मेसेज जसा आहे तसा :-

मालक ओ मालक, असं का ओ मालक......

आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्यावर टीका करताना आपण ५ वर्ष पालकमंत्री २० वर्ष आमदार असताना किती लोकांना रोजगार दिला व रोजगार आणला याचे उत्तर द्या.......

१) जिल्ह्याचे ५ वर्ष पालकमंत्री व २० वर्ष आमदार म्हणून काम करताना आपण किती रोजगार आणला किंवा किती लोकांना रोजगार दिला?

२) महापालिकेत ५ वर्षे सत्ता असताना विजयकुमार देशमुख दररोज पाणीपुरवठा देण्याचे वचन पूर्ण करू शकले नाहीत किंवा शहरात बससेवा सुरू शकले नाही. कोणत्या नैतिकतेने आपण विकासाच्या गप्पा मारत आहात...? पुछता है सोलापूर.....!

३) ५ वर्षे पालकमंत्री, केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता असताना किती कंपन्या सोलापूरात आणल्या याचे आधी उत्तर द्या.

४) ५ वर्षे पालकमंत्री असताना शहरात अवैध व्यवसाय सुरू ठेवून तरुणांना कोणी बिघडवले ?

५) ५ वर्षे पालकमंत्री व महापालिकेत सत्ता असताना २०१६ साली मंजूर झालेले उड्डाणपूल बांधकाम अजून सुरू करू शकले नाहीत व विकासाच्या गप्पा काय मारता...?

६) महापालिका निवडणुकीत २०१७ साली जाहीरनाम्यात प्रत्येक प्रभागात १०० बेरोजगारांना गाळे देण्याचे वचन दिले होते आपण किती बेरोजगारांना गाळे दिले?

७) स्मार्ट सिटीचा शेकडो कोटी रुपये निधी कुठे गेला, कोणाचा विकास केला ?

८) मार्केट कमिटीत सभापती झाल्यानंतर काय काय दिवे लावले हे जनतेला माहित नाही काय ? गाळे वाटपात कोणी गाळा खाल्ला ?

होणार या सर्वांचा हिशोब होणार, गोरगरीब शेतकरी, जनतेच्या पोटावर पाय देणाऱ्या मस्तवाल राजकारण्याना जनताच त्यांची जागा दाखवून देणार.