भक्तिमय वातावरणात तैलाभिषेक मिरवणुकीस प्रारंभ

पहा छायाचित्रे : एकदा भक्तलिंग हर बोला हर चा जयघोष

भक्तिमय वातावरणात तैलाभिषेक मिरवणुकीस प्रारंभ

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरकरांसह देशभरातील भाविकांना उत्कंठा लागून राहिलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेतील तैलाभिषेक मिरवणुकीस 'श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय' च्या जयघोषात आज रविवारी नुकताच प्रारंभ झाला आहे. 

काही वेळापूर्वी हिरेहब्बू वाड्यामध्ये पहिला व दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा श्रीमद् काशी ज्ञानसिंहासनाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वायाध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते झाली. यावेळी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, आमदार विजयकुमार देशमुख, पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक सुरू होण्यापूर्वी खासदार प्रणिती शिंदे यांनीही हिरेहब्बू वाड्यात येऊन दर्शन घेतले. रविवारी सकाळी परंपरेप्रमाणे तेल वाहण्यासाठी हिरेहब्बू वाड्याबाहेर भाविकांनी गर्दी केली होती.

तैलाभिषेक मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथक आहे. यामागे भगवा धर्मध्वज, पंचरंगी ध्वज आहे. यानंतर संबळ वादक, हलगी पथक, सनई वादक आहे. तसेच श्री सिद्धरामेश्वरांची पालखी आहे. यामागे सातही नंदीध्वज आहेत.

हिरेहब्बू वाड्यातून सुरु झालेली ही नंदीध्वज मिरवणूक ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी जाताना परंपरेप्रमाणे सातही नंदीध्वज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर मानकरी देशमुखांकडून हिरेहब्बुंना सरकारी आहेर करणार आहेत. यानंतर सातही नंदीध्वज ६८ लिंगांतील पहिले लिंग असलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरातील अमृत लिंगाजवळ परंपरेप्रमाणे जाणार आहेत. तिथे हिरेहब्बू आणि शेटे अमृत लिंगाची विधिवत पूजा करतील. यानंतर शेटे यांना हिरेहब्बू विडा देणार आहेत. यानंतर ६८ लिंगांच्या तैलाभिषेकास प्रारंभ होईल. आणि संपूर्ण तैलाभिषेक पूर्ण झाल्यानंतर रात्री नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यात परत येणार आहेत.
-------------
काशीपीठाच्या जगद्गुरूंची प्रमुख उपस्थिती
श्रीमद् काशी ज्ञानसिंहासनाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वायाध्य शिवाचार्य महास्वामीजींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जगद्गुरूंचे हिरेहब्बू वाड्यात आगमन होताच भाविकांनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. 


---------------
श्री आजोबा गणपतीस बाराबंदी

सोलापूरकरांच्या श्रध्देचे स्थान असलेल्या मानाच्या श्री आजोबा गणपतीस यात्रेनिमित्त बाराबंदीचा वेष परिधान करण्यात आला होता. यावेळी भाविकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी गर्दी केली होती.


------------
नंदीध्वजांचे भाविकांनी केले मनोभावे स्वागत 

तैलाभिषेक मिरवणुकीस निघण्यापूर्वी विविध नंदीध्वज विविध मार्गांनी हिरेहब्बू वाड्याकडे जाताना वाटेत भाविकांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घालून औक्षण करत पूजन केले. तसेच तैलाभिषेक मिरवणूक सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी भाविक नंदीध्वजांचे पूजन करून स्वागत करीत आहेत.
----------
दर्शनासाठी भाविकांची गर्दी 
रविवारी श्री मल्लिकार्जुन मंदिर, श्री सिद्धरामेश्वर मंदिर, हिरेहब्बू वाड्यात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.