जागरूक नागरिकाची भूमिका निभावणे हीच खरी राष्ट्रभक्ती
केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान ः चार हुतात्म्यांवरील टपाल तिकीटाचे अनावरण
सोलापूर ः प्रतिनिधी
देशाच्या साधनसंपत्तीची बचत करून जागरूक नागरिकाची भूमिका बजावणे हीच आधुनिक काळातील खरी राष्ट्रभक्ती आहे, असे प्रतिपादन केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी व्यक्त केले. टपाल खात्याने सोलापूरच्या चार हुतात्म्यांवर काढलेल्या टपाल तिकीटाचे प्रकाशन शनिवारी श्री. चौहान यांच्या हस्ते नियोजन भवन येथे करण्यात आले.
भारतीय टपाल विभाग, परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था आणि सोलापूर सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर महापौर श्रीकांचना यन्नम, खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, जि. प. अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलचे सीपीएमजी हरिष अग्रवाल, पीएमजी मधुमिता दास उपस्थित होत्या. तर अकोला येथील खा. संजय धोत्रे हे ऑनलाईन सहभागी झाले.
यावेळी हुतात्मा मलप्पा धनशेट्टी यांच्या वारसदार अन्नपूर्णा धनशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्मार्टसिटीचे संचालक प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर, जगदीश बिडकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी दीपप्रज्वलनानंतर सोलापूर सोशल फाऊंडेशनने चार हुतात्म्यांवर तयार केलेली चित्रफित दाखवण्यात आली. यानंतर हुतात्मा मल्लपा धनशेट्टी, हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा श्रीकिसन सारडा आणि हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्यावर काढण्यात आलेल्या टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात वेळ पडली तर देशासाठी मरण्याची आवश्यकता होती. स्वातंत्र्यानंतर आता देशासाठी
जगण्याची गरज आहे. प्रत्येकाने नागरिक म्हणून देशाप्रती असलेले आपले कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण सगळ्यांनीच स्वतः ला हुतात्म्यांचे वारस समजून देशाची सेवा केली पाहिजे असेही केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी सांगितले. महापौर श्रीकांचना यन्नम म्हणाल्या, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सोलापूरचे योगदान मोठे आहे. चार हुतात्मा हे सोलापूरचे भूषण आहेत.
अमृता अकलूजकर यांनी सूत्रसंचालन तर मधुमिता दास यांनी आभाप्रदर्शन केले.
या कार्यक्रमास प्रवर डाक अधिक्षक व्यंकटेशश्वरा रेड्डी, डॉ. सतीश वळसंगकर, प्रा. डॉ. सुहास पुजारी, किशोर चंडक, रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी, प्राचार्य गजानन धरणे, शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापुर, रा. स्व. संघाचे शहर संघचालक राजेंद्र काटवे, माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेविका संगीता जाधव, अश्विनी चव्हाण, राजश्री चव्हाण तसेच टपाल विभाग, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
--------------------
चार हुतात्म्यांचा इतिहास
अभ्यासक्रमात यावा
सोलापूरच्या चार हुतात्म्यांचा इतिहास अभ्यासक्रमात यावा अशी मागणी यावेळी आ. सुभाष देशमुख मनोगतात व्यक्त केली. याबद्दल केंद्र शासनाकडे पाठपुरावा करु असे आश्वासन खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी भाषणावेळी दिले.
-----------
कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी महात्मा गांधी पुतळा, चार हुतात्मा पुतळा येथे अभिवादन केले.