ओढ्यात वाहून जाणाऱ्या वृद्धाचे जीव धोक्यात घालून वाचविले प्राण !

अग्निशमन दलाचे जवान समीर पाटील अन् रावसाहेब सलगर यांचे धाडस

ओढ्यात वाहून जाणाऱ्या वृद्धाचे जीव धोक्यात घालून वाचविले प्राण !

सोलापूर : प्रतिनिधी

ओढ्यात वाहून जाणाऱ्या वृद्धाचे प्राण स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविल्याची घटना डोणगाव येथे घडली. सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान समीर पाटील आणि रावसाहेब सलगर यांनी ही धाडसी कामगिरी बजावली.

डोणगाव येथील ज्येष्ठ नागरिक संगप्पा चौगुले (वय ७२) हे पाय घसरून पाण्यात पडले. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे परिसरातील सर्व ओढे, नाले भरून वाहत आहेत. डोणगाव येथील ज्येष्ठ नागरिक पाय घसरून पाण्यात पडल्याची वार्ता सोलापूर अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाचे जवान फायरमन समीर पाटील, रावसाहेब सलगर तसेच मोटर ड्रायव्हर विश्वनाथ काबणे यांनी तडक डोणगाव येथे धाव घेतली. संगप्पा चौगुले हे पाण्यामध्ये वाहून जात असल्याचे दिसतात अग्निशमन दलाचे जवान समीर पाटील यांनी तत्काळ प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या ओढ्यामध्ये उडी घेतली. पोहत जाऊन त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला बाहेर काढले. पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे अवघ्या काही मिनिटांचा उशीर झाला असता तर संगप्पा चौगुले हे कदाचित वाहून गेले असते. परंतु अग्निशमन दलाचे समीर पाटील व सहकारी रावसाहेब सलगर त्याठिकाणी वेळेत पोचल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत ओढ्यात वाहून चाललेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचविले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांच्या व ग्रामस्थांच्या ताब्यात दिले. समीर पाटील, रावसाहेब सलगर तसेच मोटर ड्रायव्हर विश्वनाथ काबणे यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.