ब्रेकिंग ! चौथी लाट येण्यापूर्वी मास्क सक्तीचा करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

ब्रेकिंग ! चौथी लाट येण्यापूर्वी मास्क सक्तीचा करा

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यात चौथी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे. दिल्लीसह अन्य पाच राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत, महाराष्ट्रात चौथी लाट येण्यापूर्वी सर्व बाबतीत सज्ज रहा, मास्क सक्तीचा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.

दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून श्री. ठाकरे यांनी राज्याची कोरोनाची स्थिती जाणून घेतली. सोलापुरातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त दीपाली घाटे,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयस्वाल, मनपाचे उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कोरोनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीसह इतर पाच राज्यात कोरोना वाढत आहे. महाराष्ट्रातही 950 रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची घातकता लक्षात येत नाही, मात्र काळजी घ्यावी. लाट सुरू झाली की काही करता येत नाही, म्हणून ऑक्सिजन, बेडची उपलब्धता, व्हेंटिलेटर, औषधे या सर्व बाबतीत सज्जता ठेवा. हॉस्पिटल आणि इतर ठिकाणी आगी लागू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

राज्यात लसीकरणाचा वेग वाढवून सक्तीबाबत आणि बुस्टर डोसचे अंतर कमी करण्याबाबत प्रधानमंत्र्यांशी बोलून घेतो, असेही ते म्हणाले.

चौथी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा
कोरोनाची घातकता टाळण्यासाठी मास्क आणि लसीकरणाबाबत जागृती करा, कोविडच्या चाचणीचे प्रमाण वाढवा, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री.  ठाकरे यांनी दिल्या.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनीही विविध सूचना केल्या.