परोपकार ही भगवंताची पूजा

श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी : एक हजार जणांनी घेतली मुद्रा दीक्षा

परोपकार ही भगवंताची पूजा

सोलापूर : प्रतिनिधी

परमात्मा स्वतःसाठी काहीच मागत नाही. मात्र परमात्मा परोपकार करण्यास सांगतो. परोपकार ही भगवंताचीच पूजा आहे, असे प्रतिपादन बेंगलुरू येथील उत्तरादी मठाचे मठाधिपती श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांनी केले.

श्री उत्तरादी मठाच्यावतीने सैफुल येथील पाटील नगर येथे बुधवारी आयोजित केलेल्या सोलापूर दिग्विजय कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रारंभी बुधवारी सकाळी मठाधिपती श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी  यांची पाद्यपूजा करण्यात आली. यानंतर त्यांनी सुमारे १ हजार भाविकांना मुद्रा दीक्षा दिली. तसेच स्वामीजींच्या हस्ते चतुर्युग मूर्ती श्री मूलरामचंद्रांची तसेच मध्वाचार्यांच्या संस्थान प्रतिमांची पूजा करण्यात आली. तसेच शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. पं. विद्यानिधी आचार्य जोशी यांनी यजमानपद भूषविले.

मठाधिपती श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी म्हणाले, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्मप्रवृत्त राहण्यास भारतीय शास्त्रांमध्ये सांगितले आहे. जसा कर भरणे अनिवार्य आहे तशाच पद्धतीने परोपकार करणेही अनिवार्य आहे. जनता सेवा हीच जनार्दनाची सेवा असते. मानवाची सेवा म्हणजेच माधवाची सेवा आहे. स्नान, संध्या, जप, गीता पारायण, विष्णुसहस्रनाम पारायण, तीर्थयात्रा, आई वडिलांची सेवा ही कर्मे केली तर परमेश्वराची कृपादृष्टी होते. आपण केलेले कर्म भगवंताला अर्पण करावे. अन्यथा ते कर्म पूर्ण होत नाही, असेही श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांनी सांगितले.
----------------
दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी

बेंगलुरू येथील उत्तरादी मठाचे ४६ वे मठाधिपती असलेल्या श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांचे हजारो भक्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आहेत. ते सोलापुरात तीन दिवस राहणार असून एकूण १७ गावांत त्यांचा धार्मिक प्रवास होणार आहे. बुधवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गुरूवारी सोनी अपार्टमेंटच्यामागे, सोनी नगर, दमाणी नगर येथील राजीव कुलकर्णी यांच्या निवासस्थानी दर्शन, महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.