मनोज जरांगे पाटील यांची सोलापुरात गर्जना

काय म्हणाले ? वाचा ! : आरक्षण एल्गार सभा

मनोज जरांगे पाटील यांची सोलापुरात गर्जना

सोलापूर : प्रतिनिधी
आरक्षणाच्या या लढाईत विजय मराठ्यांचाच होईल. आरक्षण घेतल्याशिवाय इंचभरदेखील मागे हटणार नाही, अशी गर्जना मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे - पाटील यांनी केली. मराठा आरक्षणाबाबत गुरुवारी दुपारी हुतात्मा स्मृती मंदिरात मनोज जरांगे - पाटील यांनी मराठा आरक्षण सभा घेतली. "एकच मिशन, ओबीसी मधूनच मराठा आरक्षण" असे ब्रीदवाक्य घेऊन या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण परिषद होणार आहे. या मराठा आरक्षण परिषदेच्या प्रसारासाठी मनोज जरांगे पाटील गुरुवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारशी झालेल्या चर्चेअंती मराठा समाजाने सरकारला आरक्षण जाहीर करण्यासाठी ४० दिवसांची मुदत दिली आहे. परंतु सरकारवर मराठा आरक्षणाच्या मागणीचा दबाव रहावा आणि सरकारला मराठा समाजाची ताकद दिसावी याकरिता आंतरवली सराटी येथे १५० एकर जागेमध्ये भव्य आरक्षण परिषद होणार आहे. या परिषदेला मराठा समाज बांधवांनी हजर रहावे याकरिता मनोज जरांगे - पाटील महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठा समाज बांधवांना साद घालत आहेत. या दौऱ्यात गुरूवारी श्री. जरांगे - पाटील यांनी सोलापूरातील मराठा बांधवांशी संवाद साधला.

श्री. जरांगे - पाटील म्हणाले, व्यवसायाच्या आधारावर इतरांना ओबीसी आरक्षण दिले असेल तर मराठा समाजही शेती व्यवसायात आहे. जर सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर इतरांना आरक्षण दिले असेल तर मराठा समाजही सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे आम्ही सिद्ध करु. सरकारने नेमलेल्या समितीने केलेल्या अभ्यासाअंती हैदराबाद आणि इतर ठिकाणाहून तब्बल ५ हजार अशी कागदपत्रे मिळाली आहेत की ज्या कागदपत्रांचा आधार मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणार आहे. त्यामुळे कोणीही कितीही युक्तिवाद केला तरी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही, असेही श्री. जरांगे - पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजाने कधीही कोणाचाही द्वेष केला नाही. मराठा समाजाने केलेल्या कामाच्या आधारावर अनेक मराठेतर नेते मोठे झाले. आता आरक्षणाअभावी मराठ्यांची पोरं आत्महत्या करीत आहेत, शिक्षण, नोकरीमध्ये मागे पडत आहेत. अशावेळी आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत तर ते आम्हाला मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणीही मनोज जरांगे - पाटील यांनी याप्रसंगी केली. याप्रसंगी हुतात्मा स्मृती मंदिर तुडुंब गर्दीने भरून गेले होते. बाहेरील बाजूसदेखील स्क्रीनवरून भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

सोलापूर शहरात सभा झाल्यानंतर मंगळवेढा आणि पंढरपुरात त्यांच्या सभा होणार आहेत. त्याचबरोबर उद्या शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी बार्शी येथे सकाळी ११.३० वाजता तर कुर्डूवाडी येथे सायंकाळी ६.३० वाजता मनोज जरांगे पाटील सभा घेणार आहेत.