नरसय्या आडम मास्तरांच्या आत्मचरित्राचे उद्या प्रकाशन
सोहळ्यास हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन : प्रकाशन सोहळ्याची जय्यत तयारी
सोलापूर : प्रतिनिधी
माजी आमदार नरसाई आडम यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन गुरुवार, १ जून रोजी सायंकाळी नॉर्थकोट मैदानावर होणार असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ऍड.एम.एच.शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सचिव शेख म्हणाले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य सचिवपद यशस्वीपणे भूषविलेले माजी आमदार कॉ. नरसय्या मास्तर यांनी आजमितीस कामगार चळवळ आणि पक्ष वाढीसाठी दिलेले योगदान हा सोलापूरच्या मागील सहा दशकांचा चालता बोलता इतिहास असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांनी अनेक लढे यशस्वी केले, संघटीत-असंघटीत कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन सरकारची सरकारचे लक्ष वेधले, न्याय हक्काची लढाई व धनशक्ती विरुद्ध श्रमशक्ती मजबुत करण्यासाठी अव्याहतपणे परिश्रम घेत आहेत. ही बाब चळवळीत येणाऱ्या नवोदित कार्यकर्त्यांसाठी स्फूर्ती आहे.
अशा व्यक्तिमत्वाचा आत्मचरित्र प्रकाशन सोहळा उद्या, १ जुन रोजी नॉर्थकोट मैदान येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याला समस्त सोलापूरकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले
या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून शहरात ठिकठिकाणी लाल झेंडे, स्वागत कमानी, डिजीटल फलक लावण्यात येत आहेत. गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियावर कॉ.आडम मास्तर यांनी आजवर केलेली आंदोलने, लढे, मोर्चा, कार्याची माहिती देणारे पोस्ट टाकण्याचे उपक्रम चालू आहे. यामध्ये फेसबुक, व्हाट्सएप,ट्विटर,इंस्टाग्राम हँडल चालवत आहेत. तसेच प्रसार आणि प्रचारासाठी १ लाख पत्रके छपाई केली असून त्याच्या वितरणासाठी संपूर्ण शहरात पक्षाच्या नेतृत्वाखाली गटसभा, कॉर्नर सभा, ऑटो रिक्षा प्रचार, निमंत्रण पत्रिका वितरित करण्यात येत आहेत. या सभेला किमान ५० हजार लोक येतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते व नेतेगण ही या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते.
या पत्रकार परिषदेस माकपचे जिल्हा सचिव अँड. एम. एच. शेख, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कुरमय्या म्हेत्रे, सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, प्रा. अब्राहम कुमार, सुनंदा बल्ला, ॲड. अनिल वासम आदी उपस्थित होते.