भक्तिमय वातावरणात नंदीध्वज मिरवणुकांना प्रारंभ
पहा छायाचित्रे : श्री सिद्धरामेश्वरांचा अखंड जयघोष : अक्षता सोहळ्यास लवकरच प्रारंभ
सोलापूर : प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या अक्षता सोहळ्याच्या मिरवणूकीला नुकताच प्रारंभ झाला. हिरेहब्बू वाड्यामध्ये नंदीध्वजांची पूजा करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. अवघ्या काही तासातच सर्व नंदीध्वज श्री सिद्धरामेश्वर मंदिरात अक्षता सोहळ्यासाठी पोहोचणार आहेत.
मिरवणुकीच्या अग्रभागी पंचरंगी ध्वज आहे. यामागे भगवा ध्वज, सजवलेली बैलगाडी, हलगी पथक, पालखी, वाद्यवृंद आहे. तसेच मानकरी हिरेहब्बू पारंपारिक वेशात चालत आहेत. नंदीध्वज मिरवणूक मार्गावर नागरिकांनी नंदीध्वजाच्या पूजनासाठी मोठी गर्दी केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कार भारतीकडून हिरेहब्बू वाड्यापासून श्री सिद्धरामेश्वर मंदिरापर्यंत तीन किलोमीटर आकर्षक रांगोळीच्या पायघड्या अंथरण्यात आल्या आहेत. दत्त चौकात संस्कार भारतीकडून क्रीडा विषयक रांगोळीचे गालीचे काढण्यात आले आहेत. यामध्ये विटी दांडू, कॅरम, बुद्धिबळ तसेच मैदानी खेळ या गालीच्यामधून दाखवण्यात आले आहेत.
संस्कार भारतीला यंदाच्यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल क्रीडा विषयक संदेश देण्यासाठी हे गालीचे साकारण्यात आले आहेत. तसेच यात हिंदुस्थानने यशस्वी केलेल्या चांद्रयान मोहिमेची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे. ही रंगावली साकारण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कार भारतीचे केंद्रीय प्रमुख रघुराज देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र रंगवली प्रमुख संगीता भांबुरे, शहर प्रमुख ममता अवस्थी, सचिव अनंत देशपांडे, बाळकृष्ण वल्लाल, सचिन वेणेगुरकर, सीमा मनगोळे, किरण आवटे, स्वाती म्हमाणे, किरण तंबाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे.
सातही नंदीध्वज पारंपारिक मार्गाने ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात पोहोचल्यानंतर काही वेळातच अक्षता सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.