छत्रपती श्री शिवरायांचा सुवर्ण होन पाहण्याची सोलापूरकरांना संधी
उद्योजक किशोर चंडक यांच्या दुर्मिळ नाणी अन् तिकिटांचे दोन दिवसीय प्रदर्शन

सोलापूर : प्रतिनिधी
चंडक परिवार, एसपीएम इंग्लिश स्कूल आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक किशोर चंडक यांनी ६१ वर्षांपासून संग्रहित केलेल्या दुर्मिळ आणि जगप्रसिद्ध नाणी, तिकिटे आणि स्वाक्षऱ्यांचे प्रदर्शन दिनांक २१ (शनिवार) आणि २२ (रविवार) डिसेंबर रोजी हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणातील एसपीएम इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती किशोर चंडक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
हे प्रदर्शन शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सोलापूरकरांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे दुर्मिळ सुवर्ण होन, चांदीच्या रुपया, सुवर्ण फनम आणि काकतीय (वारंगळ साम्राज्य) यांची दुर्मिळ सुवर्ण नाणी, २ हजार ते २५०० वर्षांपूर्वीची जनपदे, गुप्त आणि इतर शासकांची सुवर्ण, चांदी व तांब्याची नाणी, स्वतंत्र भारताची १९ वेगवेगळ्या किमतीची चांदीची स्मारक नाणी, स्वातंत्र्यपूर्व काळातील चलनी रुपये व नोटा अशा वस्तूंचा समावेश या प्रदर्शनात आहे.
याशिवाय मुघल काळातील सोलापूरची नाणी, राशीवर आधारित मुघलांची दुर्मिळ सुवर्ण नाणी, जगातील पहिले तिकीट, पहिले पाकीट, भारतातील पहिली तिकिटे अशा अनेक ऐतिहासिक वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित नाणी आणि तिकीट संग्रह तसेच हिटलरने काढलेली चित्रे देखील पाहायला मिळणार आहेत.
याशिवाय जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक, भारतरत्न पुरस्कार विजेते, चंद्रावर पाऊल ठेवणारे चांद्रवीर, भारतातील महान विभूती तसेच ब्रिटिश राजे, राणी यांच्या स्वाक्षऱ्या या प्रदर्शनात पाहायला ठेवण्यात येणार आहेत. अबालवृद्ध सोलापूरकरांनी या प्रदर्शनास भेट द्यावी आणि संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन किशोर चंडक, श्रुती चंडक, वेदांत चंडक, नम्रता चंडक, एसपीएम इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, मुख्याध्यापक शिवानंद शिरगावे तसेच रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी, सचिव ब्रिजकुमार गोयदानी यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस किशोर चंडक, श्रुती चंडक, नम्रता चंडक, एसपीएम इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, मुख्याध्यापक शिवानंद शिरगावे तसेच रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी उपस्थित होते.